दिल्ली परिसरात यमुना नदी अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवर पोहचली आहे . या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या प्रशासनाने अनेक ठिकाणी दक्षतेचे आदेश जारी केले आहेत. आज सकाळी अकरावाजता रेल्वेच्या जुन्या पुलानजिक यमुनेची पातळी 205.34 मीटरपर्यंत पोहचली होती. ती पातळी सतत पडणाऱ्या पावसामुळे आणखी वाढण्याचीही शक्यता वर्तवण्यात आल्याने दिल्ली प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा आदेश जारी केला आहे.
पूरनियंत्रण विभागाने विविध भागात तेरा मदत बोटी तैनात ठेवल्या आहेत. अन्य 21 बोटीही तैनातीसाठी सज्ज आहेत. हरियाणा राज्यातील हथनीकुंडातून जादा पाणी सतत सोडले जात असल्याने दिल्ली परिसरात यमुनेची पातळी वाढली आहे. दिल्लीच्या जिल्हा प्रशासनाकडून या स्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. हवामान खात्याने दिल्ली एनसीआर परिसरात पावसाच्या शक्यतेने ऑरेंज ऍलर्ट जारी केला आहे.