भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंगावणाऱ्या यास चक्रीवादळाचा लँडफॉल झाला आहे. ओडिशातील धामरा बंदर आणि बालासोरदरम्यान यास चक्रीवादळाचा तडाखा बसला. या भागामध्ये तब्बल १२० ते १४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनिशी हे चक्रीवादळ धडकलं. त्यामुळे किनारी भागात असणाऱ्या घरांचं आणि नागरी सुविधांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
एनडीआरएफ, कोस्ट गार्ड, भारतीय नौदल अशा सर्व यंत्रणा बचावकार्य करण्यामध्ये आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर लँडफॉल झाल्यानंतर यास चक्रीवादळानं झारखंडच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला आहे.
त्यामुळे आत्तापर्यंत समुद्रात असणारं हे चक्रीवादळ आता पूर्णपणे जमिनीवर आलं आहे. यापुढच्या प्रवासात वादळाचा वेग आणि तीव्रता हळूहळू कमी होत जाणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.