राज्यात कोरोना माहामारीमुळे परिस्थिती गंभीर बनत असतानाच आता आरोग्य सेवा अपुरी पडत चालली आहे. त्यातच ऑक्सिजन अभावी मृत्यूचे सत्रही सुरूच आहे. आज जळगावात ऑक्सिजन अभावी एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ केला.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरु आहेत. त्यात अपुऱ्या ऑक्सिजन साठ्या अभावी गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील जामनेर उपजिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. ऑक्सिजन साठा संपल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या तब्बल 12 रूग्णांना जळगाव भुसावळ रोडवरील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याची वेळ आली. या 12 रूग्णांना 8 रुग्णवाहिकेद्वारे हलवताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घडना घडली. या घटनेनंतर जामनेर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ केला.