पुलवामा हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले मेजर विभुती शंकर धौंडीयाल यांच्या पत्नी निकीता कौल यांनी भारतीय सैन्यदलात प्रवेश मिळवला आहे. बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून त्यांनी लष्करी सेवेत दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अवघड मानली जाणारी परीक्षा पास झाल्यानंतर एका वर्षाचं करून कठोर प्रशिक्षण पूर्ण करून निकीता यांनी हे यश मिळवलं आहे.
भारतीय लष्करात निकीता कौल यांची लेफ्टनंट पदावर नेमणूक करण्यात आली आहे. वूमन स्कीमच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या परीक्षेतून त्या भारतीय लष्करात दाखल झाल्या आहेत. शनिवारी (29 मे) रोजी आयोजित भारतीय लष्कराच्या दीक्षांत सोहळ्यामध्ये निकीता यांनी पहिल्यांदाच लष्करी गणवेश आपल्या अंगावर चढवला.
दीक्षांत सोहळ्यानंतर "मला सहानुभूती नको. आपण एकजूट आणि कणखर राहूयात," अशी प्रतिक्रिया निकीता यांनी त्यावेळी दिली होती. निकीता यांनी भारतीय लष्करात प्रवेश करताच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर सध्या निकीता कौल यांचीच चर्चा आहे.