पश्चिम बंगालमध्ये भाजपाला गळती लागली आहे. एकापाठोपाठ एक आमदार भाजपाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. भाजपाचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते.
भाजपाचे बागदाचे आमदार विश्वजीत दास यांचा सेनेटर हॉटेलमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पाडला. "भाजपा सुडाचं राजकारण करत आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून पश्चिम बंगालमधील नागरिकांच्या अधिकारावर गदा आणत आहेत. मी सर्व नेत्यांना जनतेच्या भल्यासाठी ममता बॅनर्जी यांना साथ देण्याची विनंती करतो", असं विश्वजीत दास यांनी सांगितलं.
दरम्यान याआधी सोमवारी विष्णुपूरच्या भाजपा आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमावेळी मंत्री पार्थ चटर्जी आणि तृणमूल काँग्रेसचे इतर नेते उपस्थित होते. त्यामुळे आता पश्चिम बंगालमध्ये भाजपा आमदारांनी संख्या ७२ झाली आहे.