जुलै महिन्यात देशभरात सर्वसाधारण (९४ ते १०६ टक्के) पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुढील १० दिवसात मॉन्सूनच्या पावसामध्ये फारशी वाढ होण्याची शक्यता नसून ११जुलैनंतर देशातील बहुतांश भागात पावसामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
यंदा मॉन्सूनने देशातील अनेक भागात नेहमीपेक्षा लवकर आगमन केले आहे. साधारणपणे मॉन्सून ८ जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापण्याची शक्यता असते. मात्र, आता दिल्लीसह राजस्थानमधील काही भागात अजूनही मॉन्सून पोहचला नाही. येत्या १० जुलैपर्यंत त्यात प्रगती होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.
संपूर्ण देशाचा विचार करता देशभरात जून महिन्यात १० टक्के अधिक वर्षा झाली आहे. मध्य भारतात सरासरीपेक्षा १७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामानाने दक्षिण भारतात सरासरीपेक्षा ४ टक्के अधिक पाऊस झाला आहे.जुलै महिन्यांचा विचार करता संपूर्ण देशात जुलै महिन्यात ९४ ते १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. असे मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले.