नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. राज्यामध्ये महायुती लवकरच सत्ता स्थापन करणार आहे. सोमवारी शपथविधी समारंभा पार पडणार आहे. तर सांगलीमध्ये दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर. आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील विजयी झाले आहेत. त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
यंदा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात संजयकाका पाटील विरुद्ध रोहित पाटील अशी लढत पाहायला मिळाली. या दमदार लढाईत रोहित पाटील यांनी जोरदार विजय प्राप्त केला आहे. त्यांच्यासाठी ही लढाई अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. त्यांना ही उमेदवारी वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी मिळाली होती. या संधीचं त्यांनी सोन केलं आहे. रोहित पाटील यांनी २७ हजारांच्या लीडने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी अजित पवार गटाच्या संजयकाका पाटलांचा पराभव केला आहे. त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण असून राज्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राज्यातील तरुण उमेदवार आणि दिवंगत आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी आपल्या आमदारकीचा पहिला दिवस सकाळी औक्षण करून सुरुवात केली. यावेळी ग्रामस्थांच्या भेटीगाठी आणि समस्या जाणून घेण्यासाठी पहिला दिवसापासून सुरुवात केली आहे. यावेळी रोहित पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती. आमदार झालो हे अजूनही आपल्याला पटत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच आपण केलेल्या कष्टाचं फळ मिळालं. तसेच राज्याच्या हितासाठी विधानसभेत प्रश्न मांडणार असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले.
काय म्हणाले रोहित पाटील?
मला अजूनही पटत नाही आमदार झालो. पण जे कष्ट केले आठ नऊ वर्ष त्या कष्टाचे फळ हे माळ या मतदारसंघातल्या लोकांनी दिलं. येत्या काळामध्ये जे काम अनौपचारिक पद्धतीने करत होतो. ते आता औपचारिक पद्धतीने करणार आहे. तासगाव तालुक्यात नवनवीन कंपन्या आणण्याचं काम करणार आहे. तसेच राज्यातले व्यवसाय बाहेर जात आहेत हा चिंतेचा विषय आहे. रोजगारांना संधी देणार तसेच आरोग्याचे समस्या सोडवणार आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्याच्या हितासाठी जी भूमिका मला घ्यावी लागेल आणि जे प्रश्न आम्हाला मांडावे लागतील ते मी विधानसभेत मांडणार असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले.