राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महायुती आणि मविआकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. अशातच आता मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कात कोणाचा आवाज घुमणार याकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
शिवाजी पार्क मैदानावर 17 नोव्हेंबरला कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार, याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.
थोडक्यात
शिवाजी पार्कवरील सभेचा निर्णय नगरविकास विभागाकडे
महापालिकेकडून अहवाल सुपूर्द
परवानगीबाबत उत्सुकता
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर १७ नोव्हेंबर रोजी कोणत्या राजकीय पक्षाची सभा होणार, याचा निर्णय आता नगर विकास विभाग घेणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने याबाबतचा अहवाल नगर विकास विभागाकडे पाठवला असून अंतिम निर्णय सरकार घेणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. शिवाजी महाराज पार्क मैदानात प्रचार सभा घेण्याच्या परवानगीकरीता पालिकेकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व शिवसेना (उद्धव ठाकरे), शिवसेना (एकनाथ शिंदे) या तिन्ही पक्षांनी अर्ज केले आहेत. मात्र १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी अद्याप निर्णय न झाल्यामुळे शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेने पालिकेला पुन्हा स्मरणपत्रे पाठवले आहे. मात्र त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही.
निवडणुकीचा प्रचार १८ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपणार आहे. दरम्यान, ज्या पक्षांचे अर्ज आले आहेत त्यांच्या निवेदनासह परवानगीचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे पाठवला असून नगर विकास विभागच त्यावर निर्णय घेणार आहे. या परवानगीसाठी पहिला अर्ज मनसेने केल्याचा दावा आहे. त्यामुळे आता नक्की कोणाला परवानगी मिळणार, याबाबत उत्सुकता आहे.