चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शहरी व ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाईन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यामध्ये यादव, परमार, पांडे अशा नावांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. तर गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं सांगण्यात येत असून यात वाढ होत आहे.
मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले आहे.