विधानसभा निवडणूक मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महाविकास आघाडी, महायुती, तसेच इतर पक्षांकडूनही उमेदवारांच्या प्रचाराचे कार्यक्रम आखले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षासाठी शरद पवारांनी प्रचारसभांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातील उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार यांच्या 55 जाहीरसभा होणार आहेत. पुढील दोन आठवड्यात शरद पवार यांच्या 55 सभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पवार दररोज अंदाजे चार चे पाच सभा घेणार आहेत. पवार 45 मतदार संघातून 55 प्रचारसभा घेणार आहेत.
आजपासून बारामती मतदारसंघातून शरद पवार यांचा झंझावाती प्रचार दौरा सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी गाव भेटीदरम्यान शरद पवार हे तब्बल 8 सभा घेणार आहेत. तसेच ते उद्या मुंबईत राहुल गांधीच्यासभेलाही हजेरी लावणार आहेत. तर गुरुवारी नागपूरनंतर खानदेशमध्ये ते प्रचार करणार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठीही शरद पवार यांनी 80 पेक्षा जास्त प्रचारसभा घेतल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 10 पैकी 8 खासदार निवडून आणले होते.
शरद पवार गटाचे 88 उमेदवार रिंगणात
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आतापर्यंत 88 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यातील पहिल्या यादीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 45 उमेदवारांची नावाची घोषणा करण्यात आली होती. तर दुसऱ्या यादीत 22, तिसऱ्या यादीत 9, चौथ्या यादीत 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली होती. यानंतर पाचव्या यादीत शरद पवारांकडून 5 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या उमेदवारामध्ये माढा मतदारसंघातून अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंढरपूर-मंगळवेढा मतदारंसघातून अनिल सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.