राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत काल(सोमवारी) संपली. आता राज्यात सर्वत्र सर्वच पक्षांचा प्रचाराचा धडाका पाहायला मिळत आहे. अशातच आता महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवृत्तीची चर्चा सुरु झाली आहे.
शरद पवार यांनी आपला बालेकिल्ला बारामतीमध्ये जाहीरसभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारसभेमध्ये केलेल्या भाषणात त्यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मात्र, राजकारणातून निवृत्त झाल्यानंतरही सामाजिक कार्य करत राहणार असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्याच्या अवघ्या महिनाभर आधी शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेतेमंडळी व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी तो मागे घेतला. त्यानंतर लगेचच पक्षात फूट पडली. अजित पवार गट सत्ताधारी महायुतीमध्ये सामील झाला. तेव्हाही शरद पवारांच्या राजीनाम्याची जोरदार चर्चा पाहायला मिळाली होती. आता शरद पवारांनी राजकीय निवृत्ती घेण्याचेच थेट संकेत दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा होऊ लागली आहे.