मुंबईतील हाय व्होल्टेज विधानसभा मतदारसंघ म्हणजे दादर माहीम मतदारसंघ. कारण या मतदारसंघात उमेदवार आहेत ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या विरोधात शिंदे यांच्या शिवसेनेतून सध्याचे विद्यमान आमदार सदा सरवणकर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे कुठेतरी सदा सरवणकर यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी अशा राजकीय चर्चा होत आहे. यातच मनसे शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार मागे घेणार असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेईन, अशी भूमिका सदा सरवणकर यांनी घेतली आहे. सकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सदा सरवणकर म्हणाले की, मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. पुन्हा एकदा एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे त्यासाठी काही त्याग करावा लागला तर तो करण्यास मी तयार आहे. मी माझी भूमिका त्यांना सांगितली आहे. आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सरवणकर म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्यासाठी आवश्यक ती भूमिका घेणे गरजेचे आहे. ही निवडणूक मी जास्त प्रतिष्ठेची न करता जास्तीत जास्त आमदार निवडून यावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. एका सीटमुळे महायुतीच्या इतर जागांवर परिणाम होऊन नये ही आमची भूमिका आहे. राज साहेबांबत देखील आमच्या मनात प्रेम आहे. संघटनेसाठी मी अनेकदा त्याग केला आहे, त्यामुळे हा त्याग करण्यासाठी देखील आम्ही तयार आहोत. मनसे त्यांचे उमेदवार मागे घेणार असतील तर एका जागेसाठी मी अडून राहणार नाही. मी माझ्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर ठेवल्या आहेत, असे सरवणकर यांनी सांगितले.