विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. यातच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर दादर माहिम मतदारसंघाबाबत चर्चा सुरु आहे. मनसेकडून अमित ठाकरे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेकडून सदा सरवणकर यांनीही अर्ज दाखल केला आहे मात्र माहीम विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी मागे घ्यावी, असं शिवसेना पक्षातून अनेक नेत्यांनी म्हटलं आहे. मात्र माहीमधून विधानसभा लढण्यावर सदा सरवणकर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना सदा सरवणकर म्हणाले की, 365 दिवस मी मतदारांसाठी छोटं मोठं जे आवश्यक आहे ते काम करत आलो आहे. त्यामुळे माझी प्रार्थना अशीच होती की, लोकांची भावना ही आहे की आपल्यातलाच सर्वसामान्यांना भेटणारा आपल्याला उमेदवार हवा आणि प्रेशर जर म्हणाल तर ते मतदारांचे आहे की, आपण माघार घेऊ नये.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्हाला आपल्यातलाच आणि गेल्या अनेक वर्षापासून काम केलेला आपल्यासारखा उमेदवार हवा आहे. मतदार सांगत आहेत की आपण फॉर्म भरला पाहिजे आम्ही आपल्याला निवडून देऊ. अर्थात हा जन माणसाचा कौल आहे. तो आदर राखावाच लागेल. असे सदा सरवणकर म्हणाले.