राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. काहींनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर अजूनही काही पक्षात डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरु आहे. अनेक ठिकाणी नाराज इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अशातच वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघाची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळाली असून भावना गवळी यांना तिथून उमेदवारी मिळाली आहे. मात्र भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी बंडखोरी करत याच मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं महायुतीमध्ये तणाव वाढला आहे. भाजपची ही खेळी शिवसेनेला संपवण्यासाठी आहे का असा सवाल युवा सेना जिल्हाप्रमुख रवी भांदुर्गे यांनी उपस्थित केलाय.
तर अनंतराव देशमुख यांनी उमेदवारी मागे न घेतल्यास वाशिम जिल्ह्यात इतर दोन मतदारसंघामध्ये शिंदेंची शिवसेना वेगळी भूमिका घेणार असल्याचंही रवी भांदुर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. अनंतराव देशमुख हे आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं सांगताहेत असा आरोप करत भांदुर्गे यांनी भाजपवर नाराजी बोलून दाखवली तर वरिष्ठांनी अनंतराव देशमुख यांची समजूत काढावी असे विनंतीही भांदुर्गे यांनी केलीये.