पराग शहा ठरले राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार
पराग शाहांकडे 2 हजार 178 कोटींची संपत्ती
निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर
पराग शहांच्या संपत्तीत साडेचार पट वाढ झालीय
पराग शाह घाटकोपर पूर्वचे भाजप उमेदवार
विधानसभा निवडणुकांचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारिख मंगळवारी होती. त्यानंतर आता उमेदवारीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांचा तपशील समोर आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार हे पराग शहा ठरले आहेत. पराग शहा हे भाजपचे उमेदवार आहेत.
घाटकोपर पूर्व मतदारंसघातील भाजपचे उमेदवार पराग शहा सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. 2019च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत डोळे विस्फारून टाकतील अशी दणदणीत वाढ झाल्याचे स्पष्ट झालं आहे. 2019 साली त्यांची संपत्ती 700 कोटी इतकी कोटी होती. मात्र, आता त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती तब्बल 2 हजार 178 कोटींच्या घरात गेली आहे. संपत्तीतील ही वाढ जवळपास साडेचार पट आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत पराग शहा यांच्या संपत्तीची आकडेवारी जाहीर झाली तेव्हा ते खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. यंदा प्रकाश मेहता यांना डावलून सलग दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यात आता त्यांच्या संपत्तीच्या आकड्यांनी घेतलेली भरारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. ते स्वतः व्यावसायिक आहेत. त्यांच्या पत्नीही गुंतवणूक व्यवसायात आहेत. खासगी कार्यालये, जमिनी, बॉण्ड, बँकेतील ठेवी, जमीन खरेदी, निवासी गाळे हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत, अशी माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.