निवडणुकांची धामधूम सुरू आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपकडून विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाईल, अशी चर्चा होती. त्यामध्ये मुंबई उपनगरातील कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील जागेबाबत वेगवेगळ्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या.
लोकसभा निवडणुकीआधी या मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना देखील गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराची चर्चा देशभरात झाली होती. सुदैवाने महेश गायकवाड आणि राहुल पाटील या गोळीबारातून बचावले. या घटनेमुळे महायुतीकडून ही जागा भाजपला मिळणार का हा प्रश्न उपस्थित झाला होता.
सध्या गणपत गायकवाड कुठे आहेत?
या घटनेनंतर गणपत गायकवाड यांना अटक झाली. गणपत गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत आपण गोळीबार केला असल्याचं कबूल केलं होतं. त्यामुळे पोलिसांकडे सर्व पुरावे उपलब्ध होते. याशिवाय पोलीस ठाण्यात सीसीटीव्हीत संपूर्ण घटना कैद झाली होती. त्यामुळे गणपत गायकवाड हे तेव्हापासून जेलमध्येच आहेत. गणपत गायकवाड यांना हे गोळीबार प्रकरण प्रचंड भोवलं. कारण तेव्हापासून ते जेलमध्येच आहेत. याशिवाय त्यांच्या कृतीमुळे गणपत गायकवाड यांचं विधानसभेचं तिकीट देखील कापलं गेलं आहे. मात्र, तरी भाजपने गायकवाड यांना दिलासा दिला असल्याचे म्हटलं जात आहे. भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महायुतीची जागा अखेर भाजपाच्याच पारड्यात पडली आहे. याठिकाणी आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेत फटाके फोडत, पेढे वाटत जल्लोष साजरा केला. यावेळी सुलभा गायकवाड यांनी आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी जाहीर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सर्व पक्षश्रेष्ठी यांचे आभार मानले आहेत. तर कल्याण लोकसभेतील डोंबिवली आणि कल्याण पूर्व याठिकाणी भाजपाचे उमेदवार जाहीर झाले आहेत.