निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं असून विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. काल महायुतीने पत्रकार परिषद घेतली.
या पत्रकार परिषदेमधून सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर करण्यात आला. आज महायुतीच्या नेत्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यातच काल माध्यमाशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल यामध्ये चर्चा सुरु आहे. कुठेही फार ताणतणाव आमच्यामध्ये नाही आहे. अतिशय खेळीमेळीचं वातावरण आहे. सर्व प्रश्न सुटणार आहेत. आम्ही युती म्हणून घटक पक्ष असतील मग ती महायुती असेल आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. मी तुम्हा दाव्याने सांगेन 2014, 2019मध्ये आम्हाला जे स्पष्ट बहुमत मिळाले त्यापेक्षा जास्त बहुमत जनता आमच्या पारड्यामध्ये टाकेल. असे गिरीश महाजन म्हणाले.