मराठा आंदोलक मनोज जरांगे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक घेत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी ते आग्रही होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आचारसंहिता लागू करू नका, निवडणुका जाहीर करू नका यासाठी ते आग्रही होते. मात्र, निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुती सरकारचा यथेच्छ समाचार घेतला.
आरक्षण न देता निवडणुका घेतल्यास महायुती सरकारला निवडणुकीत पाडू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता. त्यानंतर आज मनोज जरांगेंनी अंतरवालीत महत्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते मराठा समाज बांधवांसोबत चर्चा करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता अंतरवाली सराटीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राजकीय अभ्यासक, वकिलांना हजर राहण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं आहे.
दरम्यान, या बैठकीमध्ये मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने नाराज मनोज जरांगे महायुतीला पाडण्याचा कट करणार की निवडणुकीसाठी काही वेगळी रणनिती आखणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे विधानसभेसाठी मराठा समाजातील उमेदवार उतरवणार असल्याची ही चर्चा आहे. त्यामुळे मनोज जरांगे विधानसभा निवडणुकीत महायुतीला आव्हान देतील का हे पाहणं औत्सुक्याचे आहे.