विधानसभेचं बिगुल वाजलं आहे. सत्ताधारी महायुती आणि विरोधकांमध्ये मॅजिक फिगर गाठण्यासाठी चढाओढ सुरु झाली आहे. त्यामुळे सध्या जागावाटपावर भर द्यावा लागत आहे. महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. मात्र, भाजप विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त जागा लढणार हे निश्चित आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 106 जागा मिळाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर भाजप जास्त जागा लढणार आहे. मात्र, अद्यापही त्याबाबत कोणतेही निश्चित सूत्र ठरवण्यात आले नाही. या संदर्भात दिल्ली दरबारी बैठकांचा ससेमिरा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहिर करेल अशी शक्यता होती. इच्छुक उमेदवारांचे ही यादी कधी जाहीर होणार याकडे लक्ष वेधले आहे.
शुक्रवारी रात्री दिल्लीमध्ये भाजप नेते अमित शाह यांच्या निवासस्थानी जागावाटपावर 3 तास खलबतं झाल्याचे पाहायला मिळाले. जागावाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे. लवकरच महायुतीचं जागावाटप जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये कुणाला किती जागा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.