राज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झालेली पाहायला मिळत आहे. केंद्र निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता सर्व पक्ष बैठकी घेण्यासाठी तयारीत लागलेले आहेत या बैठका सगळ्याच पक्षांमध्ये होत आहेत. केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत आता अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबंरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तर झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाची फेरी ही 13 तारखेला होणार असून दुसरी फेरी ही 20 ला होणार आहे आणि विधानसभेचा अंतिम निकाल हा 23 नोव्हेंबंरला जाहीर केला जाणार आहे.
अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे, 'आप' पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नाही अशी बातमी आता समोर आली आहे. भाजप विरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी पक्षनेतृत्वाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार असून 'आप' पक्षाचं दिल्लीवर विशेष लक्ष असल्याची माहिती समोर आली आहे.
11 ऑक्टोबरला आम आदमी पार्टीचे सरचिटणीस आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. आपच्या महाराष्ट्र कार्यकरिणीला संघटना विस्तारासाठी निवडणूक लढवायची आहे मात्र पक्षाच्या वरिष्ठांकडून महाराष्ट्रात निवडणूक लढायची नाही असे संकेत दिले जात आहेत.