राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महायुती आणि मविआकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष भाजपच्या रणनीतीकडे वेधलं आहे. काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.यात कन्हैया यांनी भाजपच्या प्रचारावर घणाघाती प्रहार केला. धर्म वाचवण्याची लढाई आम्ही निश्चित लढू, पण या लढाईत फडणवीसांच्या रील बनवणाऱ्या पत्नी सहभागी होणार आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एक है तो सेफ है, या नाऱ्याचाही त्यांनी समाचार घेतला
थोडक्यात
कन्हैया कुमार यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
धर्म वाचविण्याच्या लढाईत फडणवीसांच्या पत्नी सहभागी होतील का? विचारला सवाल
यवतमाळ जिल्ह्यात प्रचारसभेत टीका
दरम्यान, "यवतमाळ जिल्ह्यात कमळ उमलल्यापासून शेतकऱ्यांच्या दृष्ट चक्राचा खेळ सुरू झाला आहे. हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. केवळ अदानीसाठी पक्ष फोडून विकले गेले आहेत. पहिल्यांदा आमदार, मुख्यमंत्री विकताना पाहिले, अशा शब्दांत काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी भारतीय जनता पक्षावर तोफ डागली आहे. आम्ही आतापर्यंत सामान विकताना पाहिलं होतं. मात्र, इथे आमदार विकले गेले आहेत. मुख्यमंत्री विकले गेले. खरंतर आता त्यांनी ज्यांची पार्टी तोडली आणि त्यांच्या पार्टीचे सिम्बॉल तोडलं आणि आता विश्वासघातकी लोकं होलोग्रॅम सुद्धा बदलायला निघाले असल्याचं विधान कन्हैया कुमार यांनी केले आहे. गद्दारी करणाऱ्या आमदारांना या निवडणुकीत धडा शिकवा आणि महाराष्ट्र वाचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.