एक है तो सेफ है चा अर्थ केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असा अर्थ समजावा का?महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. सर्व पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. मतदानाच्या दिवसाचे काऊंटडाऊन सुरु झालं आहे. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह हे महाराष्ट्रात प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे मविआकडूनही प्रचारसभा घेतल्या जात आहेत. पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रातील प्रचारसभेत 'एक है तो सेफ है'चा नारा दिला. भाजपच्या निवडणूक रणनितीविषयी अधिक जाणून घेण्यासाठी भाजप नेते प्रविण दरेकर यांची क्रॉसफायर या विशेष कार्यक्रमात लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी मुलाखत घेतली. यावेळी प्रविण दरेकर यांनी अनेक मोठे खुलासे केले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे मिशन काय आहे?
भाजपचे मिशन जनतेसाठी असतं. निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते बूथ अध्यक्षापर्यंत मिशन मोडवर काम केलं जातं. पंतप्रधान मोदी जेवढे जनतेसोबत संवाद साधतात तेवढा कोणत्याच पंतप्रधानांनी संवाद साधला नसेल. पंतप्रधान मोदी जनतेला सर्वश्रेष्ठ समजतात. केंद्रीय मंत्री अमित शाह, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पक्षातील सर्वच दिग्गज निवडणुकीसाठी काम करतात.
लोकसभेच्या निकालानंतर ऑपरेशन सिस्टीममध्ये बदल करण्यात आला का? विधानसभा निवडणूका गांभीर्याने घेतल्या जात आहेत का? दिग्गज नेत्यांना प्रचारात उतरण्याची वेळ आली का?
भाजपने अनेक धक्के पचवले आहेत. म्हणून भाजप जगातील मोठा पक्ष म्हणून उभा आहे. जितका मोठा धक्का तितका भाजपचा पाया आणखी पक्का होतो. पराभवाने आम्ही घरी बसत नाही, तर जोमाने कामाला लागतो. जिंकलो तरी यश डोक्यात जात नाही. कारण जनता सेवा सर्वोतोपरी हे आमचे ब्रीद. आम्हाला धक्क्यातून कामाला लागायची सवय आहे कारण शून्यातून भाजपचे विश्व उभं राहिलं आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा निवडून आले. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या वाट्याला कमी जागा आल्या. त्याबाबत आकलन करत उपाययोजना करत चांगलं यश मिळवण्याची तयारी करण्यात आली आहे.
जागावाटपाचा निर्णय घेतला जातो तेव्हा सर्व्हेचं कारण पुढे करण्यात आलं होतं. विदर्भात फटका बसेल म्हणून पंतप्रधान मोदी यांनी प्रचारसभांसाठी महाराष्ट्रातून शिरकाव विदर्भातून केला का?
विदर्भ काँग्रेसचा गड होता, बालेकिल्ला होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासाला गती दिली. भाजपच्या नेतृत्वात रखडलेले प्रकल्प, योजना मार्गी लावल्या. विदर्भात भाजपला मोठे यश मिळेल. महाराष्ट्रातील यशात विदर्भाचा मोठा वाटा असेल. पंतप्रधान मोदी यांना अविकसित भागा विषयी वेगळ्या संवेदना आहेत. विदर्भासाठी महायुती सरकारने भरभरून दिलं आहे.
विदर्भात दिग्गज नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना देखील सुरुवात विदर्भापासून करावी लागत आहे. विदर्भामध्ये 288 पैकी सर्वाधिक जागा विदर्भात आहेत म्हणून विदर्भावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं का?
विदर्भातच नाही तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळ्यातही सभा झाल्या. नियोजन करून सभा घेण्यात आल्या.
लोकसभा निवडणुकीतील निकालानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपला ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे का?
भाजप सदैव ताक फुंकून पित असते. काही राज्यामध्ये भाजपची सत्ता गेली होती. मात्र, भाजप कार्यकर्त्यांनी अपार कष्ट करून सत्ता आणलेल्या आपण पाहिल्या आहेत. भाजपची सत्ता जाईल असं वाटलं होतं, मात्र, कार्यकर्त्यांनी सत्ता टिकवली. कष्ट हा भाजप कार्यकर्त्यांचा दागिना आहे.
योगी आदित्यनाथ यांनी नारा दिला, 'बटेंगे तो कटेंगे'. कुणाच्या विखुरण्याची भिती वाटतेय. महायुतीच्या की भाजपच्या बंडखोरांमध्येच ही परिस्थिती निर्माण होऊ शकते?
विशिष्ट समुदायाची लोकं एकजुटीने नारा देतात आणि मतदान करतात. हे हिंदवी स्वराज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा विचार केला होता. त्यामुळे हिंदूंनी आपापसांत मतभेद करू नये. हिंदूंमधील जाती-उपजातींमध्ये विभागले जाऊ नये. नाहीतर आपलं त्यामुळे नुकसान होईल असा त्याचा अर्थ आहे. म्हणून सकल हिंदूंनी एक व्हावं, एक है तो सेफ है अशी भूमिका मांडण्यात आली.
एक है तो सेफ है चा अर्थ केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस असा अर्थ समजावा का?
एक म्हणजे एक व्यक्ती नव्हे तर समुदाय होय. हिंदू समाज म्हणून आपण एक असू, एकात्मता या देशात असेल तर आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने ती ताकद, एकजूट महत्त्वाची ठरते.
राज्यात दोन उपमुख्यमंत्री पाहायला मिळत आहेत तो महाराष्ट्रही सेफ आहे?
महाराष्ट्र विशाल आहे. महाराष्ट्रात जर कोणत्याही एका पक्षाचे सरकार आलं नाही तर मग सत्तास्थापनेसाठी आणखी इतर पक्षासोबत युती-आघाडी करवी लागते. अशावेळी सत्तास्थानं विभागावी लागतात. त्यामध्ये सत्तेत येण्यात बटवारा होतो. एकत्रित येण्यात बटवारा होत नाही.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महायुतीच्या विरोधात असल्याचे अनेकदा दिसतं. नवाब मलिकांबाबत घेतलेली भूमिका काय?
अजित पवार हे कामात वाघ आणि स्वभावाने स्पष्टवक्ते आहेत. त्यांच्या मनातील, पोटातील गोष्ट समोर येत असते. नवाब मलिकांविषयी भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील उमेदवार देऊ नये ही महायुतीची अपेक्षा होती. परंतू कधीतरी अशा अपवादात्मक गोष्टी होत असतात. मात्र, भाजप आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
सायन कोळीवाडा, चेंबूरची जबाबदारी दरेकर यांच्यावर असताना शेजारचा मतदारसंघातून नवाब मलिक, सना मलिक लढत असताना महायुतीकडून जबाबदारी कशी वाटून देण्यात आली?
भाजपमध्ये जबाबदारी दिली जाते. ती पार पडणं आमचं काम असतं. सायन कोळीवाडा, चेंबूर मतदारसंघामध्ये जाऊन भाजप उमेदवाराला ताकदीने निवडून आणणं. महायुतीतील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणं हे काम आहे.
नवाब मलिक देशद्रोही आहेत की नाही? नवाब मलिक यांच्याविषयीचे पुरावे भाजपकडे आहेत का?
नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध नाही अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.
महायुतीकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित?
महाराष्ट्रात मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. महायुतीतील घटक पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यांला वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. त्याप्रमाणेच भाजपकडून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावे ही इच्छा. शरद पवार यांच्यानंतर महाराष्ट्राची नस ओळखणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.
राज्यातील समीकरणं महायुती आणि मनसे बदलणार का?
देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व मिळावे म्हणून राज ठाकरे यांनी लोकसभेला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. देवेंद्र फडणवीस, भाजपवर थेट टीका केली नाही.
बंड थंड करण्यामध्ये भाजपला यश मिळेल का?
गोपाळ शेट्टी यांची नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. भाजपला बंड थंड करण्यात 100 % यश मिळालं आहे. विरोधकांना आयतं कोलित मिळालं असं वाटलं होतं. मात्र, नेतृत्वाने याविषयी एक चांगला संदेश महाराष्ट्राला दिला.
भाजप फोडाफोडीच्या राजकारणाला कारणीभूत आहे का?
महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण कोणी सुरु केलं हे सगळ्यांना माहिती आहे. जनादेश शिवसेना आणि भाजपला असताना फुटून ठाकरेंनी काँग्रेससोबत युती केली त्यांना कोणी जाब विचारला नाही. मात्र, भाजपकडे जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे आले, शिवसेना आले तर आमच्यावर आरोप केले जातात. आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. विकास हेच आमचे ध्येय आहे. सत्तेसाठी विचारधारेची जुळवाजुळव होत असते, त्याला फोडाफोडी समजू नका.
संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी इथे क्लिक करा-