crossfire with vinod tawde 
विधानसभा निवडणूक 2024

Cross Fire With Vinod Tawde: ठाकरेंनी भाजपशी गद्दारी करून काँग्रेसशी हातमिळवणी केली हे सर्वात दुर्दैवी: विनोद तावडे

राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची धामधूम पाहायला मिळत आहे. महायुती आणि मविआकडून प्रचारसभांचा धडाका सुरु आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत सगळ्यांचं लक्ष भाजपच्या रणनीतीकडे वेधलं आहे. आजच्या क्रॉसफायर कार्यक्रमात भाजप नेते विनोद तावडे यांची मुलाखत लोकशाही मराठीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांनी घेतली. यावेळी अनेक गोष्टींचे गौप्यस्फोट झाले.

Team Lokshahi

२०१९ साली युती तुटली, शिवसेना आणि भाजपने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. कारणीभूत कोण होतं?

शिवसेना आणि भाजप युती तुटली नव्हती. शिवसेनेने वेगळा होण्याचा निर्णय घेतला होता. एका मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरे यांना मान्य नसणाऱ्या काँग्रेससोबत ठाकरे गेले त्यावेळी खरी गद्दारी झाली. जनादेश युतीला होता. शरद पवार आणि काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यावर जनादेशाच्या विरोधात गेले. एकवेळ पक्ष विसर्जित करेन पण काँग्रेससोबत जाणार नाही असं बाळासाहेबांचं मत होतं. तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाजपशी गद्दारी करणं ही सर्वात दुर्दैवी घटना आहे.

शिवसेना भाजपमुळे वाढली हे वक्तव्य भाजप नेत्यांकडून केलं जायचं यामागचं सत्य काय?

मला नाही वाटत की प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे यांचं शिवसेना भाजपमुळे वाढली हे वक्तव्य कधीच नव्हतं. शिवसेना हा स्थानिक महानगरपालिकेचा पक्ष होता. तो विधानसभा स्तरावर आला. कारण प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरे यांनी एकत्र युती करायचं ठरवलं. त्यामुळे शिवसेनेला राज्यपातळीवर येण्याचा आग्रह हा प्रमोद महाजन यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांनी ते ऐकून त्याप्रमाणे प्रगती केली.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय का घेतला? त्यांच्यावर अशी वेळ का आली?

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना हिंदुत्वासाठी केली. ज्यावेळी शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह धनुष्यबाण हे हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत चाललंय त्यातून सोडवण्यासाठी हिंदुत्वाला मानणारा आमदारांचा वर्ग घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केलं.

भाजपचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमध्ये हात होता का? त्यानंतर जे घडलं ते महाराष्ट्राने पाहिलं.

शिवसेनेच्या आमदारांमध्ये खदखद सुरू होती. स्थानिक नेतृत्व आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यात काही हालचाली केल्या. देवेंद्र फडणवीस तसेच काही स्थानिक नेते होते. केंद्र आणि राज्यातील नेतृत्वाने एकनाथ शिंदेंच्या मदतीने हा निर्णय केला.

अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा राज्यपातळीवर की दिल्ली नेतृत्वाकडून झाला? कोणाच्या पातळीवर हा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार तुमच्यासोबत आले?

आमच्या पक्षातील प्रत्येक निर्णय केंद्र आणि राज्यातील नेतृत्व एकत्रितपणे घेतात. एकनाथ शिंदेंना जेव्हा सोबत घेतले तेव्हा १४९-१५० बहुमताच्या पुढे ४-५ अंकांचा फरक होता. जेव्हा अजित पवार सोबत आले तेव्हा १८०-१९० अंकावर पोहचलो. तेव्हा जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचा तो गट आमच्यासोबत आला.

अजित पवार यांचा आधार का घ्यावा लागला?

१४९-१५० हे तकलादू बहुमत असतं. मजबूत बहुमत असेल तर पुढचे २ वर्षे जनतेच्या हिताचे राज्य करणारं सरकार देऊ शकतो हा यामागचा हेतू होता.

महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल आहे का?

2014 मध्ये भाजप सत्तेत आलं तेव्हा भाजपच्या 123 जागा होत्या. बहुमत नव्हतं. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी विरोधीपक्षात बसायचे ठरवले होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांचाच पाठिंबा भाजपला मिळाला होता. राज्यात मजबूत सरकार स्थापन करण्यासाठी अजित पवार यांचा पाठिंबा घेतला. अजित पवार यांच्याबाबतच्या कोणत्याही चौकशा शिथिल केल्या नाही. त्या कोर्टात सुरु आहेत.

भाजपने घेतलेल्या निर्णयाला अजित पवारांची नाराजी का दिसून येते? समजूत काढण्यात अपयश आहे की त्यांना भाजपचे निर्णय पटत नाहीत?

भाजपने अजित पवार यांना नवाब मलिकांना तिकीट देऊ नये हे आधीच सांगितलं होतं. तरी त्यांनी मलिकांना तिकीट दिलं. तसेच अजित पवार यांचा आग्रह होता की, 'बटेंगे तो कटेंगे' हे इथे चालत नाही. जम्मू काश्मिरमधील कश्मिरी पंडित विखुरले गेले तर कापले गेले. एकजुटीने राहिल्यास मजबुतीने पुढे येऊ शकतो हाच त्या मागचा उद्देश आहे.

एकजूट कोणाची अपेक्षित आहे? कोण विखुरले जाऊ शकतात त्याची भीती आहे? महायुतीमध्ये फूट पडण्याची ही नांदी आहे?

एकजूट राष्ट्रवादी विचाराच्या मतांची आहे. आपण एक राहिलो तर सेफ असू. 'एक है तो सेफ है' एकजुटीची भूमिका आहे.

विनोद तावडे यांना महाराष्ट्र जवळचा वाटतो की दिल्ली?

महाराष्ट्रात इतकी वर्षे काम केल्यानंतर देश पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत काम करायला मिळतं आणि खूप काही शिकायला मिळतं. 'ऑन्ली राष्ट्र नो महाराष्ट्र'

'एक है तो सेफ है' चा अर्थ काय?

राहुल गांधी म्हणतात, 'जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी'. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विभागले जाऊ. त्यामुळे एक राहा सेफ राहा.

विधानसभेत मोठा भाऊ भाजप असेल का?

भाजप जास्त जागा लढत आहे. ९०-१०५ जागा जिंकून येणार असल्याचा विश्वास आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिळून १६५ पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे.

काका वि. पुतण्या, भावाभावाविरोधीत लढण्याचं राजकारण भाजपला अभिप्रेत होतं का?

2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी जर गद्दारी केली नसती. तर महाराष्ट्राची ही अवस्था झाली नसती. आपण स्वत: विरोधीपक्ष नेते असताना सभागृहात विलासराव देशमुख, अजित पवार, तटकरे यांच्यावर टीका करताना तुटून पडायचो. मात्र ते व्यक्तीगत पातळीवर कधीच काही नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर टीका करताना सगळ्या प्राण्यांच्या नावाने टीका करून झाली. असा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असू शकत नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक कोण?

एक कुणी खलनायक नसतं. मात्र, सुरुवात उद्धव ठाकरे यांनी केली. २०१९ साली उद्धव ठाकरे यांनी जनादेशाच्या विरोधात गेले नसते तर हे झालं नसतं.

मराठा वि. ओबीसी वादाचा निकालावर किती परिणाम होणार?

उमेदवार उभे न केल्याने निकालावर परिणाम जाणवणार नाही. तसेच भाजपने मराठा समाजापुढे जाऊन आरक्षणाची नेमकी काय वस्तूस्थिती आहे हे समजावून सांगितलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यामागील सर्व घटनाक्रम सांगितला. अखेरीस भाजपने मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं. तरी भाजपविरोधात वक्तव्य केली जातात यामागचं कारण काय हे कळेलच.

महायुती जिंकल्यास मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल?

एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपचे केंद्रीय नेतृत्व मिळून याबाबत निर्णय घेतील. ही सगळी चर्चा निवडणुकीनंतर करणार आहोत.

एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये प्रवेश मिळणार का?

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधून सध्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. त्यामुळे सध्याच्या स्थितीनुसार काम आहे तसं सुरू राहिल. मात्र, येत्या काळात भाजप अशा नेत्यांच्या स्वागतासाठी उत्सुक राहिल.

संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी क्लिक करा-

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान