भाजप खासदार धनंजय महाडिक यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत धनंजय महाडिक यांनी केलेल्या भाषणावर निवडणूक विभागाने आक्षेप घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
भाजप खासदार धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी अशी मुख्य निवडणूक आयोगाकडे महिला काँग्रेसकडून मागणी करण्यात आली आहे. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी प्रचार करण्यासाठी बंदी घालावी त्याचसोबत भाजपने ही धनंजय महाडिक यांच्यावर कारवाई करुन पक्षातून त्यांची हकालपट्टी करावी अशी देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे.
धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात विधानसभा निवडणूकीच्या प्रचार सभेत लाडक्या बहिण योजनेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन काँग्रेस आक्रमक झाली आहे. धनंजय महाडिकांनी लाडक्या बहिणींना दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला होता. घ्यायचं आमच्या शासनाचं आणि गायचं त्याचं असं नाही चालणार. 'आमचे पैसे घेऊन विरोधकांचं कौतुक चालणार नाही'1500 रुपये घेऊन कॉंग्रेसच्या रॅलीमध्ये जाणाऱ्या महिलांचे फोटो काढा आणि त्यांचे फोटो पाठवा मग व्यवस्था करतो असं वक्तव्य धनंजय महाडिक यांनी केलं होत.
त्यामुळे कॉंग्रेसच्या अलका लांबा या मागणी करत म्हणाल्या की, महिलांना धमकवल्याप्रकरणी धनंजय महाडिक यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यास बंदी घालावी, तर दरम्यान भाजप पक्षानेही धनंजय महाडिक यांची पक्षातून हकालपट्टी करावी असंही अलका लांबा यांनी म्हटलं आहे.