विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा प्रचाराचा नारळ फुटला आहे. मुंबईमध्ये शिवसेनेची पहिली प्रचारसभा होत आहे. भाऊबीजेचा मुहुर्त साधत या प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.
कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर आणि शिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. भाऊबीजनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत. मूळचे भाजपचे असलेल्या मुरजी पटेल यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
कुर्ला-नेहरूनगर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या घेण्यात आलेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे.
विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईमध्ये होणारी ही पहिलीच सभा आहे. मंगेश कुडाळकर हे आता ओपनिंग बॅट्समन झाले आहेत. तुम्हाला आता चौकार आणि षटकार मारायचे आहेत. आणि विरोधकांना क्लीन बोल्ड, गुल करायचे आहे. विरोधकांचे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. मागच्या वेळी मंगेश कुडाळकर हे 24 हजारच्या लीडने जिंकले होते. आता त्यांचं लीड हे पन्नास हजारने म्हणजे दुप्पट झालं पाहिजे असं आवाहन यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
लाडकी बहिण योजना बंद करण्यासाठी विरोधक कोर्टात गेले: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आता फक्त वर्षाला भाऊबीज नाही तर दर महिन्याला भाऊबीज मिळणार आहे. त्यांच्या खात्यात पैसे नाही जमा झाले त्यांच्या खात्यात सुद्धा जमा होणार हा निरोप द्यायला आलो असल्याचा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. विरोधक म्हणतात की ही योजना बंद होईल आणि या योजनेत खोडा घालणाऱ्या विरोधकांना तुम्ही चपलेचे जोडे दाखवणार की नाही? असा सवाल शिंदेंनी उपस्थित महिलांना विचारला आहे. "कोर्टाने चपराक लगावली. ते लोक असं म्हणत असतील की लाडक्या बहिणीला ज्यांनी पैसे दिले ते गुन्हेगार आहेत. तर असे गुन्हे करायला मी एकदा नाही तर दहा वेळा गुन्हे करायला तयार आहे." असे वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांचं संपूर्ण भाषण पाहा-