महाराष्ट्रात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. नुकताच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीला निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र, महायुतीकडून अद्याप सत्ता स्थापना झाली नाही. मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार यावरून पेच कायम आहे. तर आज २६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपविला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांकडे राजीनामा सोपविला आहे.
थोडक्यात
एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदाचा दिला राजीनामा
राज्यपालांकडे शिंदेंनी सोपवला राजीनामा
राजीनाम्यानंतर शिंदेंची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राजभवनात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच शपथविधी पार पडेपर्यंत शिंदे राहणार काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.
राज्यात मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष वेधलं आहे. महायुतीकडून २-१-१ चा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर एकनाथ शिंदे हे अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नेमकं महायुतीकडून कोणाला मुख्यमंत्रिपदाचा मान मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महायुतीने तब्बल २३२ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीमध्ये भाजपाला १३२, शिवसेनेला (शिंदे) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला (अजित पवार) ४१ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे पक्षायी बलाबल हे फॅक्टर मुख्यमंत्रीपदासाठी निर्णायक ठरतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
राजभवनात काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात जाऊन एकनाथ शिंदेंनी राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सुपुर्द केला. यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार, दीपक केसरकर, दादा भुसे देखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे राजभवनात दाखल होताच अजित पवारांनी आपल्या खुर्चीवरुन उठत देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसवले. देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या बाजूला बसत होते. मात्र अजित पवार स्वत: बाजूला झाले आणि देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्यासाठी जागा दिली. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद फडणवीस यांच्यात मुख्यमंत्रिपदावरुन दुरावा झाल्याची चर्चा रंगली होती आणि याचदरम्यान एकनाथ शिंदेंच्या बाजूला देवेंद्र फडणवीसांना बसवून अजित पवारांनी योग्य टायमिंग साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
पाहा लाईव्ह अपडेट्स लोकशाही मराठीवर-