उमेदवाराचे नाव : मंगलप्रभात लोढा
मतदारसंघ : मलबार हिल
पक्षाचे नाव - भाजप
समोर कोणाचं आव्हान - भिरूलाल जैन
दक्षिण मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ मानल्या जाणाऱ्या मलबार हिल मतदारसंघात यंदाच्या विधानसभा निवडणुकीतील लढत ही रंगतदार ठरताना दिसते आहे. उच्चभ्रू नागरिकांप्रमाणेच इथे मराठी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. महाराष्ट्राच्या सत्तेच्या नाड्या ज्या नेतेमंडळींच्या हातात असतात, त्यातील प्रमुख नेत्यांची शासकीय निवासस्थाने याच मतदारसंघात येतात. ज्यात मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान देखील आहे. इथले विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा यांना भाजपने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेत फूट पडली आणि शिवसेनेचे दोन गट तयार झाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने इथून भेरूलाल चौधरी यांना उमेदवारी दिली आहे.
कॉस्मोपॉलिटीन मतदारसंघ
मलबार हिल मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने कॉस्मोपॉलिटिन मतदारसंघ म्हणता येईल. उच्चभ्रू इमारतींपासून ते खोताची वाडी सारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या चाळी तसंच गिरगाव, अल्ट्रामाऊंट रोड, नाना चौक असे विविध भाग या मतदारसंघात येतात. वेगवेगळ्या जातीचे-धर्माचे लोकं या मतदारसंघात मोडतात. मराठी,गुजराती, जैन, मुस्लिम नागरीक या मतदारसंघातील नागरीक आहे. मलबार हिल मतदार संघात पिण्याच्या पाण्यापासून ते पार्किंगपर्यंत बऱ्याच समस्या आहेत. या समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दोन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून दिले जात आहे. शिवसेना भाजपची युती असताना हा मतदारसंघ भाजपकडे आला होता. तेव्हापासून या मतदारसंघावर लोढांनी आपली पकड मजबूत केली होती. या मतदारसंघातील विविध समीकरणे ओळखत उद्धव ठाकरे यांनी भेरूलाल चौधरी यांना उमेदवारी देण्याचे ठरवले. भेरूलाल हे पेशाने वकील आहेत. हा मतदारसंघ लोढांच्या ताब्यात गेल्याने शिवसेनेची म्हणावी तशी इथे वाढ झाली नव्हती. भेरूलाल चौधरी हे जैन समाजातले आहेत. मतदारसंघातील गुजराती, जैन समाज; उच्चभ्रू नागरीक, मराठी मते अशी विविध समीकरणे लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी भेरूलाल यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इथली लढत ही रंगतदार ठरत आहे.