उमेदवाराचं नाव - धर्मरावबाबा आत्राम
मतदारसंघ - गडचिरोली (अहेरी)
पक्षाचं नाव - राष्ट्रवादी अजित पवार
समोर कोणाचं आव्हान - (राष्ट्रवादी शरद पवार) भाग्यश्री आत्राम, (अपक्ष) अम्ब्रीशराव आत्राम
अहेरीत यावेळी राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून धर्मराव बाबा आत्राम, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाग्यश्री आत्राम असा सामना आहे. त्यात महायुती धर्म नाकारून अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपक्ष म्हणून आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे पिता कन्येसह पुतणे अशी नात्यागोत्याची तिहेरी लढत पाहावयास मिळणार आहे.
महायुतीतील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) उमेदवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याविरुद्ध कन्या भाग्यश्री आत्राम (हलेगकर) यांना महाविकास आघाडीने (राष्ट्रवादी शरद पवार गट) मैदानात उतरविले. उमेदवारी न मिळाल्याच्या नाराजीतून या धर्मरावबाबा यांचे पुतणे व माजी राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे आत्राम राजघराण्यातील तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्याची ही पहिलीच वेळ आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. विदर्भासह राज्यभरात ही लढत चर्चेची ठरत आहे.
मतदारसंघातील आव्हानं -
बहुतांश दुर्गम, अविकसित, जंगलव्याप्त आणि नक्षलग्रस्त भाग असलेल्या या मतदार संघात मुलभूत सोयीसुविधांचा अजूनही अभाव आहे. नागरिकांकडे वाहनांची संख्या वाढत असल्याने चांगल्या रस्त्यांबाबत नागरिक खूप जागरूक झाले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी वनकायद्याची अडचण आहे. मात्र शासनदरबारी पाठपुरावा करून ती समस्या दूर करण्यात सत्ताधाऱ्यांना यश आलेले नाही. तसेच सुरजागड लोहखाणीमधून वाहतूक होणाऱ्या ट्रकमुळे अनेक छोटे अपघात झाले आहेत. या जड वाहनांमुळे मुख्य मार्ग आणखीच खराब झाला आहे. भाग्यश्री आत्राम यांच्याकडून हे मुद्दे उपस्थित केले जाऊ शकतात. तसेच तेलंगणा सरकारने बनविलेल्या गोदावरी नदीवरच्या मेडीगड्डा प्रकल्पाचे सर्व पाणी तेलंगणाला दिले जाते, पण पावसाळ्यात बॅकवॅाटर आणि 85 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होतो त्यावेळी महाराष्ट्रातील (सिरोंचा तालुक्यातील) शेतकऱ्यांची जमीन खरडून निघते. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील नागरिकांची ही समस्या दूर करण्यात स्थानिक लोकप्रतिनिधीला, अर्थात राज्य सरकारला यश आलेले नाही.