महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मतदान प्रक्रिया पार पडली असून उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद आहेत. अवघ्या काही तासांत निकाल लागणार आहेत. त्यामुळे मतदार आणि उमेदवारांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे. मात्र, निकाला आधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
थोडक्यात
अजित पवारांना बारामती कोर्टाचं समन्स
बारामतीत मतदारांना धमकावल्याप्रकरणी समन्स
16 डिसेंबरला कोर्टात हजर राहण्याचे आदेश
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. त्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अडचणी वाढवणारी बातमी आली आहे. आता १६ डिसेंबर रोजी अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार २०१४ विधानसभा निवडणुकीच्या मतदार संघातील हे प्रकरण आहे. बारामती तालुक्यात मतदारांना अजित पवार यांनी धमकी दिली होती.
त्यावेळी निवडणूक प्रचार संपल्यानंतरही बारामती तालुक्यातील मासाळवाडी या गावामध्ये अजित पवार गेले होते. त्यावेळी गावातील लोकांनी पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु, अशी थेट धमकी दिली होती. तसेच तुमचा पाणी प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, परंतु मतदान आम्हालाच करा,असे अजित पवार यांनी म्हटले होते. आता अजित पवार यांना कोर्टात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.