सातारा; विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांत २१५ उमेदवारांनी २७९ अर्ज दाखल केले आहेत. मुदत संपण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी ११८ उमेदवारांनी १५४ अर्ज भरले. मंगळवारीही अनेक उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केल्याने जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी दि. ३० रोजी सकाळी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात होणार आहे. त्यानंतर माघारीची प्रक्रिया सुरू होणार आहे.
विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय धुळवड सुरू झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात निवडणुकीच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्यापासून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. विधानसभा निवडणुकीसाठी दि. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली.
आणि जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार अर्ज भरू लागले. गेल्या आठ दिवसांमध्ये सर्वच मतदारसंघांतून मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले. जिल्ह्यात पहिल्या दिवसापासून इच्छुकांनी प्रतिसाद दिल्याने मंगळवारी ११८ उमेदवारांनी १५४ अर्ज दाखल केले. त्यामध्ये सातारा विधानसभा मतदारसंघात ९ उमेदवारांनी १२ नामनिर्देशनपत्रे सादर केली.