महाराष्ट्राचा बिहार झालाय का? राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाला जबाबदार कोण?
गणपत गायकवाडांच्या पोलीस ठाण्यातील गोळीबारानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचं अधोरेखित झालंय. लोकप्रतिनिधींना पोलीस आणि कायद्याची भीती राहिली नाही का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय. आमदार जर खुलेआम गोळीबार करु लागले तर सामान्यांना त्यांना जाब विचारण्याची हिंमत कशी होणार असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय. गोळीबार करणारे गणपत गायकवाड गुन्हेगार असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
पोलिसांवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड दबाव असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. त्यामुळंच पोलीस ठाण्यात गोळीबार करण्याची हिंमत आमदारात आल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय.
पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी महाराष्ट्रातील राजकीय गुन्हेगारीकरणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेणार असल्याचं सांगितलंय.
खासदार श्रीकांत शिंदेंनीही या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय.
महाराष्ट्रातलं राजकारण हे सुसंस्कृत होतं, शालीन होतं. पण गणपत गायकवाड हे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा भेसूर चेहरा बनू पाहतो का असा प्रश्न निर्माण झालाय.