सुरतमधील हिरे बाजार शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे. सुरत येथील डायमंड बोर्स 2013 साली सुरू झाले. त्याच्या इमारतीचे नुकतेच उद्घाटन झाले. सुरतमध्ये हिऱ्यांची निर्मिती होते, तर आपल्याकडे निर्मिती आणि निर्यात होते. मुंबई हे हिरे निर्यातीचे हब आहे. सुरतला जरी नवीन बोर्स चालू केले असले, तरी आपल्याकडून एकही हिरे उद्योग सुरतला गेलेला नाही, असा दावा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला ते उत्तर देत होते. मुंबईतील हिरे व्यापार गुजरातला पळवल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर फडणवीस यांनी मुंबईतील हिरे व्यापाराचे महत्त्व आजही कायम असल्याचे सांगितले. भारत बोर्सने तसेच मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांनी आपण सुरतला जाणार नाही, असे सांगितले. उलट आपल्याकडे हा उद्योग वाढत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.