शेअर बाजारात आज पुन्हा घसरण झाली आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी तर निफ्टीमध्ये 102 अंकांनी घसरण झाली आहे. मार्केट करेक्शनमुळे आज देखील बाजाराच्या सुरुवातीला पडझडीचे सत्र सुरु आहे. 20 डिसेंबर रोजी, सेन्सेक्स निर्देशांक 931 अंकांनी घसरून 70,506 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 303 अंकांनी घसरून 21,150 वर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 30 समभाग घसरले, तर ऑटो, मेटल, बँक निफ्टी आणि सेवांसह जवळपास सर्वच क्षेत्रांत विक्रीचा जोर दिसून आला. या मोठ्या घसरणीमुळे मुंबई शेअर बाजाराचे बाजार भांडवल 9.1 लाख कोटींनी घसरले. मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 3,178 कंपन्यांचे शेअर्स घसरले. तर, 657 कंपन्यांच्या शेअर दरात वाढ झाली.