शीव उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. शनिवारपासून वाहतुकीत बदल होणार आहेत. वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा शीव स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दिशेकडील महत्त्वाचा उड्डाणपूल लवकरच पाडण्यात येऊन तेथे नवा पूल बांधण्यात येणार आहे. नव्या पुलाची बांधणी होईपर्यंत वाहतूक वळविण्यात येणार आहे. पर्यायी मार्गाचा 20 जानेवारीपासून वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. पुलाची पश्चिम वाहिनी बंद केल्याने डॉ. बी. ए. रोड दक्षिण वाहिनी शीव जंक्शनवरील वाहतूक ही शीव सर्कल, शीव रुग्णालय जंक्शन येथून उजवे वळण घेऊन, सुलोचना शेट्टी मार्गाने पुढे कुंभारवाडा जंक्शन येथून जाईल. कुर्ला व धारावीकडे कुंभारवाडा जंक्शन येथून उजवे वळण घेऊन के. के. कृष्णन मेनन मार्ग रोडने अशोक मिल नाका उजवे वळण घेऊन संत रोहिदास मार्गाने पुढे पैलवान नरेश माने चौक येथून डावे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील. पश्चिम द्रुतगती मार्ग व वांद्रेकडे कुंभारवाडा जंक्शन येथून सरळ संत कबीर मार्ग रोडने केमकर चौक येथून उजवे वळण घेऊन शीव माहीम लिंक रोडने टी. जंक्शन येथून डावे वळण घेऊन कलानगर जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जातील.