वर्ध्यातील जामणी साखर कारखान्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी विविध समस्यांना घेऊन धडक दिली आहे. वेळोवेळी मागण्याचे निवेदन दिल्यानंतर आश्वासन दिले जाते. परंतु मागण्या पूर्णत्वास नेल्या जात नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे. बैलबंडी क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील उसाची तोड तात्काळ करून, त्यांचा वजन काटा मानस ऍग्रो युनिटी दिनकर नगर जामणी येथेच करण्यात यावा, वजन काटा झालेल्या ऊस वाहतूक गाड्यांचे वजनाचे मेसेज संबंधित शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या मोबाईलवर मिळावे, ऊस तोड झाल्यानंतर उसाची पूर्ण रक्कम 45 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मिळावी ऊस तोडताना संबंधित शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची अतिरिक्त ऊस तोडणी रक्कम घेण्यात येऊ नये, यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी धडक दिली आहे. आता कारखाना प्रशासन यांच्या मागण्याकडे कशा प्रकारे लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.