देशभरातील शैक्षणिक स्थिती मांडणाऱ्या ‘असर’ या सर्वेक्षणातून यंदाही राज्यातील शैक्षणिक अधोगतीचे चित्र समोर आलं आहे. बारावीच्या स्तराचे शिक्षण घेणे अपेक्षित असलेल्या साधारण 68 टक्के विद्यार्थ्यांना भागाकार करता आलेला नाही. तसेच दहावीतील अनेकांना मराठीचे पुस्तक वाचता येत नसल्याचे विदारक चित्र समोर आलं आहे. इंग्रजीतील सोपी वाक्ये सुमारे 39 टक्के विद्यार्थ्यांना वाचता आली नाहीत. ‘प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन’ने देशभर केलेल्या अॅन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) या सर्वेक्षणाचे निष्कर्ष बुधवारी जाहीर करण्यात आले त्यातून ही माहिती समोर आली आहे. यंदा राज्यातील फक्त नांदेड जिल्ह्यातच हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यंदा 14 ते 18 वर्षे या वयोगटातील म्हणजे साधारण आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी अवगत केलेली भाषिक, गणिती कौशल्ये, त्याचे प्राथमिक पातळीवर उपयोजना अशा बाबींचे 1200 घरांना भेट देऊन सर्वेक्षण करण्यात आले.