राज्यात भीषण दुष्काळाची स्थिती असून सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. ते पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांची आज भेट घेऊन दुष्काळाच्या तीव्रतेची परिस्थिती दाहकता समोर मांडून यावर ठोस उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आचारसंहितेचा बागुलबुवा दाखवून निर्णय होत नाही. दुष्काळाला सांगून काही आचारसंहिता लागू झालेली नव्हती. त्यामुळे विभागीय आयुक्त या नात्याने शासनाची जबाबदारी आहे. दुष्काळात होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्याची. महावितरण कंपनी धडाधड विजेचे कनेक्शन तोडताना दिसत आहे. जिथे पाणी उपलब्ध आहे. तिथे जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते आहे. त्यामुळे दुष्काळासाठी ज्या काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. त्याची अमंलबजावणी करावी अन्यथा जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.