जालन्यातून ओबीसी बचाव यात्रेला सुरुवात झाली आहे. लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश यात्रा सुरु झाली. दुपारी 1 वाजता बीडच्या केवराईमध्ये आता जाहीर सभा होणार आहे. जालन्यातल्या दोदडगाव येथील मण्डल स्तंभाला अभिवादन करून ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेला सुरुवात झाली आहे. आमच्या मनातील संभ्रम, आमचं गाऱ्हाणं आम्ही माय बाप सरकार समोर मांडण्यासाठी ही यात्रा काढतोय, अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दौऱ्यावर निघण्यापूर्वी दिली आहे.
ज्या संविधानात्मक मागण्या आहेत, त्यावर शासनाने काम केलं पाहिजे अशी अपेक्षा हाके यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय, म्हणून वाद होण्याचा प्रश्न उद्भवतच नाही असं हाके यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी समोर यावं आणि ओबीसी मागासवर्गियांच आरक्षण कसं टिकवता येईल याचा प्रयत्न करावा असं आवाहन हाके यांनी सर्वपक्षीय नेत्यांना केल आहे.