मुंबई : हवेतील प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाने फटकारल्यानंतर बीएमसी प्रशासन कामाला लागले आहे. मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. शहरातील 60 फुटांपेक्षा अधिक रुंदीचे सुमारे 650 किलोमीटर लांबीचे रस्ते आणि वर्दळीचे फूटपाथ दररोज धुतले जाणार आहेत.
बीएमसीच्या या निर्णयावर तज्ज्ञांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. बीएमसीचा रस्ते धुण्याचा निर्णय म्हणजे जखम हाताला अन् मलम दाताला असा प्रकार असल्याचं बोललं जात आहे.
नागरिकांच्या दैनंदिन कामात व्यत्यय येऊ नये यासाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये पहाटे ३ ते सकाळी ६ वाजेदरम्यान, तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात स्वच्छता केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. स्वच्छता करणाऱ्या वाहनांची संख्या वाढविण्यात येत आहे."