उद्धव ठाकरेंनी भेट न घेतल्यामुळे मराठा कार्यकर्ता आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मातोश्रीबाहेर आंदोलन सुरु केलं असून ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यावर भूमिका जाहीर करावी अशी मराठा कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे आता मातोश्रीबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
याचपार्श्वभूमीवर मराठा कार्यकर्ते म्हणाले, काल आमचे सहकारी आले होते, त्यांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली. मराठा कार्यकर्त्यांची मागणी आहे, उद्धव साहेबच नाही पवार साहेबांच्या देखील घरी आम्ही जाणार आहोत. पवार साहेबांना आम्ही सांगू इच्छीतो की, तुम्ही मराठा समाजाचा आणि मोर्चाचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेऊ नका. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ती स्पष्ट करा, नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज मतदानावर बहिष्कार करेल.
तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पण घरासमोर आम्ही जाणार असून इथून सुरुवात आहे. मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक लावली होती त्या सर्वपक्षीय बैठकीला या विरोधीपक्षातला एक ही नेता आला नाही. त्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चा जाहीर निषेध करतो, आणि लवकर सर्वपक्षीय बैठक घेऊन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमची मागणी आहे.