लोकसभेपासून मराठवाड्यात जरांगे पॅटर्नची जोरदार चर्चा होती, मात्र विधानसभेमध्ये जरांगे पॅटर्नचा प्रभाव दिसला नसून मराठवाड्यात लागलेल्या निकालानंतर महायुतीने मराठवाड्यात आपला झेंडा रोवल्याचं पाहायला मिळालंय.
विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यातील जागा वाटपावरून महायुती बरोबरच मविआत चांगलाच रणसंग्राम पहायला मिळाला. यातच मराठवाड्यामध्ये महायुतीने ऐतिहासिक यश मिळवलं खरं मात्र महाविकास आघाडीला दारूण पराभवाचा सामना करावा लागलाय. महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीने 46 पैकी 40 जागेवर विजय मिळवलाय..अशातच मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा प्रभाव दिसून आला मात्र विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर जादू चालली नाही.
लोकसभेला महायुतीला मराठवाड्यात मोठा फटका बसला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व पहायला मिळालंय. अशातच अजित पवार माहायुतीत गेल्यानंतर मराठवाड्यातील महायुतीची ताकद आणखी वाढली. आता मराठवाड्यातील ठाकरेंच्या शिवसेना तसेच काँग्रेसचं भवितव्य काय असेल अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात.