समाजातील समस्या, प्रश्न हे आपण या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याची दखलही घेतली जाते.
आजचा मुद्दा अत्यंत गंभीर आहे कारण प्रश्न आहे तुमच्या आमच्या आरोग्याचा. सदृढ आरोग्य जगण्यासाठी आपण सर्वकाही करतो. पण कधी प्रकृती बिघडली तर डॉक्टरांची गरज भासतेच. पण डॉक्टरांकडे जाऊन आपण मृत्यूच्या तोंडात तर जात नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राज्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झालाय. चक्क आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात 103 बोगस डॉक्टर सापडलेत. तर औरंगाबादमध्ये अडीचशे बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरूय. तर तिकडे हिंगोलीत चक्क बोगस डॉक्टरचे रुग्णालय असल्याचं समोर आलंय. आरोग्य विभाग बोगस डॉक्टरांवर कारवाई करत नसल्याने आरोग्य विभागावर संशयाची सुई निर्माण झालीय.
248 बोगस डॉक्टर सेवा देत असल्याची सार्वजनिक आरोग्य विभागाला मागील 2 ते अडीच वर्षापासून माहिती असताना देखील कानाडोळा केला जातोय. म्हणून प्रश्न असे निर्माण होतात कि राज्यात बोगस डॉक्टरांचे रॅकेट चालवले जातेय का? सगळं माहित असून सरकार आणि आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करतोय ? बोगस डॉक्टरांना राजकीय मंडळी आणि काही बड्या अधिकाऱ्यांचं अभय आहे का ?