महायुतीला राज्यात एक हाती सत्ता आली असली, तरी आता मुख्यमंत्री पदावरून पेच निर्माण झाल्याचं बोललं जातय. विशेष करून शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना महायुतीत शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला, तरी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहुमताचा आकडा आहे. अशाप्रकारे शिवसेनेची कोंडी करण्याचा हा राष्ट्रवादीचा पहिलाच प्रयत्न नसून २०१४ला बाहेरून पाठिंबा देत, तर २०१९मध्ये पहाटेचा शपथविधी करत भाजपसोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीने शिवसेनेला शह देण्याचा प्रयत्न केला होता. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या शह काटशह राजकारणावर सध्या राज्यात चर्चा जोर धरतेय.
एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस..? महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हाच प्रश्न प्रत्येक नेत्याला माध्यमातून विचारला जातोय. शिवसेना नेत्यांकडून एकनाथ शिंदे, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावी, अशा प्रतिक्रिया देतायत. मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या.