विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालीय. या निवडणुकीत 10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने दुसरा उमेदवार मागे न घेतल्याने महाविकास आघाडी विरुद्ध भाजप हा चुरशीचा सामना झाला. भाजपने विधान परिषदेचे विरोधपक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना निवडणुकीचं तिकीट दिलं. बालपणीचा संघर्ष, महाविद्यालयीन जीवनातलं प्रेम प्रकरण, नंतर गरिबीमुळे केलेली हमाली, पुढे व्यवसायात झालेली भरभराट, राजकारणात एकामागोमाग एक मिळालेली पदं असा प्रवास प्रसाद लाड यांचा आहे.
कोण आहे प्रसाद लाड
परळच्या दहा बाय दहाच्या खोलीत प्रसाद लाड यांच बालपण गेलं. त्यांचे वडील ७०-८० च्या दशकातले रावते-देसाईंच्या बरोबरीचे शिवसैनिक होते. त्यामुळे राजकारणाचा वारसा घरातून मिळाला. १९ वर्षांचा असताना त्यांनी आमदार बाबुराव भापसे यांची मुलीला पळवून नेऊन विवाह केला. बाबुराव भापसे दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य तसंच एक वेळा विधानसभा सदस्य होते. त्याकाळी त्यांची मुलगी पळवून न्यायची, हे फार मोठे धाडस होते. तेथून प्रसाद लाड यांचा धाडसी प्रवास सुरु झाला.
महाविद्यालयात नेतेगिरी
घरुन मिळालेला वारसा आणि सासऱ्यांचे असलेल्या वलयामुळे प्रसाद लाड यांनी महाविद्यालयीन जीवनात नेतेगिरी सुरु केली. तरुण वयात राष्ट्रवादीत काम करण्यास सुरुवात केली. जयंत पाटलांमुळे वयाच्या ३१ व्या वर्षी सिद्धीविनायक न्यासाच्या विश्वस्तपदी नियुक्ती, त्यानंतर म्हाडाच्या इमारत व दुरुस्ती मंडळाच्या अध्यक्षपद मिळाले. शीव-कोळीवाडा मतदारसंघातून २०१४ मध्ये राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. पण, त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हातावरुन उतरवलं आणि भाजपचं कमळ हाती घेतलं. राष्ट्रवादीत असताना ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या मर्जीतले मानले जायचे.
भाजपमध्ये फडणवीसांच्या मर्जीतले
प्रसाद लाड हे भाजप महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्षही आहेत. राष्ट्रवादीतून भाजपात आल्यानंतरही त्यांनी मोठ्या नेत्यांची मर्जी आपल्या ठेवण्यात यश मिळवले. त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे २०१७ मध्ये प्रसाद लाड यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा त्यांना ही संधी देण्यात आली आहे.
प्रसाद लाड भाजपचे पाचवे उमेदवार
प्रसाद लाड हे भाजपचे पाचवे उमेदवार आहेत. त्यांना निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांची आणि अपक्षांची मतं मिळवावी लागणार आहेत. त्यामुळे दहाव्या जागेसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
लाड यांची कोटीची उड्डाने
कधी काळी 10 बाय 10 च्या खोलीत राहणारे प्रसाद लाड यांची संपत्तीत आता कोटीची उड्डाने घेतली आहे. या निवडणूक प्रतिज्ञापत्रात प्रसाद लाड यांनी १५२ कोटींची संपत्ती जाहीर केली. मागील निवडणुकीच्या वेळी त्यांनी २१० कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
यापुर्वीही जगतापांशी झाला होता सामना
यापूर्वी देखील भाई जगताप विरुद्ध प्रसाद लाड असा विधान परिषदेचा सामना रंगला होता. काँग्रेसकडून भाई जगताप तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाकडून प्रसाद लाड उमेदवार उभे होते. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या खेळीमुळे राष्ट्रवादीच्या आमदारांनी आपली भूमिका बदलत भाई जगताप यांना निवडून दिले. येथे प्रसाद लाड यांचा पराभव झाला आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.