भारतीय नौदलात एमएच-६० आर सी-हाँक हेलिकॉप्टरचा बुधवारी समावेश करण्यात येणार आहे. 'ब्लॅक हॉक' हेलिकॉप्टरचा हा सागरी प्रकार असून, सी-हाँक तुकडी नौदलात 'आयएनएएस ३३४' म्हणून नियुक्त केली जाईल.
सी-हॉक हेलिकॉप्टरची रचना पाणबुडीभेदी युद्ध, जमिनीवरील युद्ध, शोध व बचाव कार्य, वैद्यकीय सेवा किंवा स्थलांतर प्रक्रिया, तसेच इतर सागरी मोहिमांना पार पाडण्याच्या अनुषंगाने केली आहे. विविध वातावरणात हेलिकॉप्टरच्या कार्यप्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे.
प्रगत शस्त्रे, सेन्सर आणि एव्हियोनिक्स सूट तसेच विविध प्रकारच्या धोक्यांसाठी सक्षम असलेले सी-हॉक हेलिकॉप्टर नौदलाच्या सागरी -सुरक्षा व गरजांना पूर्ण करेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. देशाच्या सागरी सुरक्षेच्या अनुषंगाने एमएच-६० आर सी हॉक हेलिकॉप्टर नौदलाची ताकद अधिक सक्षम करेल.