तीन आठवड्यांपूर्वी सत्तेत आलेल्या राजस्थानमधील भाजप सरकारला पहिलाच मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारमधील मंत्री सुरेंद्रपाल सिंग टीटी यांचा निवडणुकीत 11 हजारांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने उमेदवार असलेल्या सुरेंद्र पाल सिंग टीटी यांचा मंत्रिमंडळात समावेश केला होता, पण निवडणुकीत त्यांची डाळ शिजू शकली नाही. निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने मतदारसंघातील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवाराचे निधन झाल्यास त्या मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात येते. स्थगित झालेल्या करणपूर मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. यानुसार दोन दिवसांपूर्वी या मतदारसंघात मतदान झाले होते.