शरद मोहोळ प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणातील अटकेतील आरोपींची संख्या आता 13वर पोहोचली आहे. आदित्य गोळे (वय 24), नितीन खैरे यांच्यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री या तिघांना अटक केली आहे. शरद मोहोळचा खून करण्यापूर्वी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी नितीन खैरे हा मुन्ना पोळेकर यांच्यासह त्या ठिकाणी हजर होता. याशिवाय शरद मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. यासाठी लागणाऱ्या संपूर्ण पैशाची व्यवस्था ही नितीन खैरे याने केली होती. तर आदित्य गोळे यांनी बंदुकीसाठी पैसे पुरवले होते. 5 जानेवारी रोजी दिवसाढवळ्या सुतरदारा येथील राहत्या घराजवळ शरद मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. शरद मोहोळचे साथीदार असलेल्या मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.