राज्यात 15 ते 18 वयोगटातील 41 टक्के मुलांचे लसीकरण(children vaccination) झाले आहे. शनिवारपर्यंत राज्यातील 25 लाख मुलांना लसीकरण केले गेले. मात्र, यात मुंबई (Mumbai)पिछाडीवर असून शहरातील 15 ते 18 वयोगटातील कोविड-19 लसीकरणाला (Covid19 vaccination)मिळालेला प्रतिसाद कमी आहे, आतापर्यंत 9 लाख पात्र मुलांपैकी केवळ 21% मुलांनीच लस घेतली आहे. त्यामुळेच, आता या मुलांना सर्व लसीकरण केंद्रावर लस देण्यास पालिकेचे धोरण आहे.
पंधरा ते अठरा वर्षे वयोगटातील मुलांच्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा प्रतिसाद वाढावा, यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणांकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. तरीही मुंबईसारख्या शहरात त्याला अद्याप पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मुंबईमध्ये पंधरा ते अठरा वर्षे या वयोगटातील २५.८५ टक्के जणांनी पहिल्या लसीची मात्रा घेतली आहे. हे प्रमाण राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील टक्केवारी पाहता भंडाऱ्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ७२.१८ तर सांगलीमध्ये ६७.२७ तर सिंधुदुर्गमध्ये ६४.६५, कोल्हापूरमध्ये ६२.५४ तर अहमदनगरमध्ये ६१.३२ टक्के मुलांनी करोना प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा घेतली आहे.