लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमधील दुर्घटनेत आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह आढळले असून अजूनही १७०हून अधिक लोक बेपत्ता आहेत, अशी माहिती समोर आली आहे. उत्तराखंडच्या चमोली इथं लष्कर,एनडीआरआएफ, आयटीबीपी आणि एसडीआरएफची पथकं बचावकार्य करत आहेत. या दुर्घटनेत २०६ लोक बेपत्ता झाले होते, असं केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.
हिमकडा कोसळल्यामुळे अनेक जण पुरात वाहून गेले होते. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयानं सांगितलं आहे. बोगद्यात अडकलेल्या सर्व नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
तपोवन भागामधील एका बोगद्यात काही कामगार अडकून पडले होते. या बोगद्यातून आतापर्यंत १६ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, अजूनही ३५ लोक त्यात अडकले आहेत. संपूर्ण बोगद्यात चिखल मोठ्या प्रमाणात झाला असल्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.