ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढली होती. त्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. आता ट्विटरनं आपली चूक सुधारली आहे. नायडूंचं पर्सनल अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आलं आहे. त्यामुळे ब्लू टिक पुन्हा दिसू लागली. ट्विटरनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही बड्या नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्लू टिकदेखील काढली आहे.
व्यंकय्या नायडूंच्या पर्सनल अकाऊंटला असलेली ब्लू टिक काढण्यात आल्यानं अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी ट्विटरवर शाब्दिक हल्ले चढवले. यानंतर ट्विटरनं स्पष्टीकरण दिलं. बऱ्याच कालावधीपासून अकाऊंट लॉग इन न केल्यानं ब्लू टिक हटवल्याचं ट्विटरनं सांगितलं. चूक सुधारली जाईल, असं आश्वासन ट्विटरकडून देण्यात आलं. त्यानंतर थोड्याच वेळात नायडूंचं अकाऊंट व्हेरिफाईड करण्यात आलं.
व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट जुलै २०२० पासून सक्रिय नव्हतं. माझ्या व्हेरिफिकेशन धोरणानुसार, अकाऊंट सक्रिय नसल्यास ब्लू टिक आणि व्हेरिफाईट स्टेटस काढलं जाऊ शकतं. मात्र आता ब्लू टिक परत देण्यात आलं आहे,' असं स्पष्टीकरण ट्विटच्या प्रवक्त्यांकडून देण्यात आलं आहे.